Pages

About


अन्नपूर्णा सुखी भव !

आता मिळतात तशी पक्वान्ने तेव्हा रस्तोरस्ती मिळत नसत. सणासुदीला किंवा विशेष प्रसंगीच ती घरच्या घरी करावयाचा शिरस्ता होता.

उदाहरणार्थ,
पुरणपोळी होळीलाच केली जाई.
दसरा तर श्रीखंड, बासुंदी किंवा एखाद्या खिरीशिवाय पार पडतच नसे.
उकडीचे मोदक तर गणपतीत असायचेच असायचे.
कोजागिरीला मसाला दूध, पाडव्याला श्रीखंड वगैरे.
असं सगळं साग्रसंगीत पार पडे.
आणि हो एक राहिलंच
घरातला वाढदिवस हमखास खीर व बासुंदीचा घाट घालून साजरा केला जायचा.

काळ बदलला.
आता बाराही महिने दसरा-दिवाळी अन होळी-गणपती.
ऑर्डर द्यायचीसुद्धा गरज नाही.
ऑफिसमधून येता येता कुठलाही पदार्थ कुठलंही पक्वान्न घरी आणता येतं.
डबासुद्धा न्यायची गरज नाही. प्लॅस्टिकच्या पिशव्या आहेतच की...
व्यापार उदीमासाठी महाराष्ट्रात आलेल्या परप्रांतीयांच्या दुकानातसुद्धा आपले उकडीचे मोदक मिळतात
आणि आम्ही ते आणून चवीनं खातो.

वाढदिवसाला तर काय तर कुठलाही आवडीचा पदार्थ घरी आणता येतो.
पण हल्ली सहसा वाढदिवस वगैरे पाव-भाजीवर साजरे केले जातात.
पावभाजीला पक्वान्नांचा दर्जा मिळालाय जणूं.
ज्यांना पावभाजी नको असते ते चायनीजच्या आधार घेतात.
अन चायनीजही रुचत नाहीत ते बार कम रेस्टोरंटच्या आश्रयाला जातात. असो.
कालाय तस्मै नमः

पण सारंच काही बदलेलं नाही.
काही घरात अद्यापही होळीला पुरणपोळीचा घाट घातला जातो.
पाडव्याच्या आदल्या दिवशी घरा-घरात चक्का टांगलेला दिसतोच.
गणपतीत नैवेद्याला निगुतीनं बनवलेले उकडीचे मोदक असतात.
दसऱ्याला बासुंदीचा थाट असतो.
अन घरातल्या वाढदिवसाला तर खीर हमखास असतेच असते.

अशा घरातल्या सुगृहिणींसाठीच खास हा ब्लॉग.
त्यांच्यासारख्या सुगरणींनीच अगदी फार प्राचीन काळापासून वेळोवेळी, निमित्तानिमित्ताने जे सल्ले किंवा ज्या सूचना किंवा जे कानमंत्र अगदी आजच्या भाषेत बोलायचं झालंच तर 'टिप्स' आपल्या लेकी-सुना-मैत्रिणी-सख्यांना दिल्या त्यांचंच हे संकलन.

त्यातलं माझं कर्तृत्व (?) असलंच तर हे इतकेच की जे जे कानावर पडलं, दिसलं, वाचलं, पाहिलं ते जेव्हाच्या तेव्हा टिपून ठेवलं. आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या माहितीच्या अनमोल मौखिक खजिन्याचं आटोपशीर संकलन करून त्याला सुयोग्य ब्लॉगचं रूप दिलं, एवढंच. बाकी सारे श्रेय हे त्यांचेच.

हा ब्लॉग आपल्याला भावला.
अन उपयोगातही आला तर मला जरूर कळवा.

असं म्हटल जातं की,
'जी गृहिणी सुरेख पुरणपोळी करते ती खरी सुगरण.'
'आपल्याही पुरणपोळ्या सुरेख होवोत' याच शुभेच्छा !

No comments:

Post a Comment

सांजाच्या पोळ्या

कणीक चांगली तिंबून घ्यावी, नाहीतर पोळ्या चिवट होतात.  रवा कमी तेलावर भाजावा, नाहीतर सांजा चिकट होऊन पोळीत नीट भरता येत नाही.  रव...

... तर काय कराल ?