Pages

Saturday 13 October 2018

सांजाच्या पोळ्या


  • कणीक चांगली तिंबून घ्यावी, नाहीतर पोळ्या चिवट होतात. 
  • रवा कमी तेलावर भाजावा, नाहीतर सांजा चिकट होऊन पोळीत नीट भरता येत नाही. 
  • रवा रिफाईन्ड तेलात भाजावा. डालड्यात भाजला तर थंड झाल्यावर डालडा थिजून सांजा घट्ट होतो व सारण पोळीभर न पसरल्यामुळे पोळीला काठ राहतात. 
  • सांजा गरम असतानाच पाण्याचा हात लावून मऊसर मळावा. लाटताना पोळी फुटून शिरा बाहेर येत नाही. 
  • सांज कोरडा झाला तर दुधाचा हात लावून मऊसूत करून घ्यावा व मग पोळ्या लाटाव्यात. पोळी फुटून सांज बाहेर येत नाही. 
  • सांज्याची पोळी भाजण्यास जरा वेळ लागतो. भाजताना वर व खाली तेलाचा हात लावल्यास पोळी लवकर भाजली जाते. 
  • पोळ्या लाटताना फुटू लागल्या तर सांजा पाण्याच्या हाताने मऊ करून घ्यावा. कणीकही तेल लावून चांगली तिंबून घावी व पोळ्या तांदळाच्या पिठीवर हलक्या हाताने लाटाव्यात.

Saturday 14 July 2018

दुधी हलवा


  • एका परातीत साधारण कीस बुडेल एवढ्या पाण्यात थोडासा सोडा घालून त्यात दुधी किसावा. किसलेला दुधी त्याच पाण्यात वाफवून मग पाणी काढून टाकावे आणि दूध, साखर वगैरे घालून शिजवावा. त्याने हलवा अगदी मऊ तर होतोच शिवाय त्याला रंगही पिस्त्याचा येतो आणि शिजवताना हमखास फुटणारे दूध या कृतीत फुटत नाही. 
  • दुधी भोपळ्याचा हलवा करताना कीस लगेच पाण्यात घालून ठेवावा. म्हणजे काळा पडत नाही. 
  • दुधीचा कीस पाणी न घालता कुकरमध्ये वाफवून घेतल्यास गॅस व वेळेची बचत होते. 
  • दुधीच्या किसाला चिमूटभर सोडा लावल्यास दुधी भोपळ्याचा नैसर्गिक रंग टिकतो व दूध घातल्यावर ते नासत नाही. 
  • दुधात एक छोटा चमचा कॉर्नफ्लोअर लावून ते हलव्याच्या मिश्रणात ओतावे. दूध फुटत तर नाहीच पण हलव्यालाही एक छान नैसर्गिक रंग येतो. 
  • खवा नसेल तर सायीसकट दूध आटवून किसात घालून परत आटवावे व मग साखर घालावी. खवा घातला नाही हे कळतही नाही. 
  • खव्याऐवजी घरात पेढे असतील तर दुधात कुस्करून हलव्यात घालावे. वेलदोडे पूड घालण्याचीही गरज नाही. 
  • खव्याला कणीक लावून पुरणयंत्रातून काढून दुधात कालवावा व शिजवलेल्या दुधीच्या किसात मिसळावा. यामुळे दुधी हलवा फुटत नाही व त्याला चांगला रंग येतो.

Thursday 14 June 2018

बासुंदी


  • निम्मे दूध मोठ्या कढईत किंवा जाड बुडाच्या पसरट पातेल्यात घेऊन प्रखर आचेवर थोडे आटवावे. त्यात थोडी साखर घालून पुन्हा उकळी आणावी व उरलेले दूध घालून पुन्हा आटवावे. असे केल्याने बासुंदीचा रंग बदलत नाही व बासुंदी चांगली दाट होते. 
  • फिक्क्या गुलाबी रंगाची बासुंदी हवी असेल तर दूध मंद गॅसवर आटवावे. 
  • बासुंदी आटवताना पातेल्याच्या/कढईच्या तळाशी थोडे पाणी घालून मगच पदार्थ आटवण्यास ठेवावा. त्यात एक काचेची गोटी टाकावी. तळाशी काहीही चिकटत तर नाहीच पण पदार्थावरही सारखे लक्ष ठेवावे लागत नाही. 
  • कच्चे दूध तापवून त्यावर झाकण ठेवावे म्हणजे दुधातील सर्व साय त्यात विरघळते. 
  • बासुंदी आटवल्यावर त्यात थेंब दोन थेंब लिंबाचा रस टाकावा. बासुंदी अगदी रवाळ होते. 
  • बासुंदी आदल्या दिवशीच करून ठेवावी. किंचित घट्ट तर होतेच पण जास्त मुरल्यामुळे रुचकर लागते. 
  • बासुंदी करताना दूध उकळले की त्यात अगदी पातळ पोहे धुवून घालावेत व ते सतत ढवळीत राहावे. बराच वेळ उकळावे. पोहे घातले आहेत हे कळतही नाही एवढे एकजीव होतात. (१ लिटर दुधाला १ वाटी पातळ पोहे असे प्रमाण घ्यावे.)
  • बासुंदीला दाटपणा येण्यासाठी दूध आटवून झाले की त्यात एक चमचा कॉर्नफ्लोअर थोड्या दुधात मिसळून ते बासुंदीत घालावे. 
  • बासुंदीत सुकामेवा ती शिजत असताना घालू नये, वाढतेवेळी हे सर्व टाकावे. छान चव लागते.

Tuesday 5 June 2018

मुगाच्या डाळीचा हलवा

  • मुगाच्या डाळीचा हलवा करताना वाटलेली डाळ, तूप मिसळून कुकरमध्ये वाफवल्यास हलवा अगदी मऊ आणि मोकळा होतो. भाजून तर लवकर होतोच पण भांड्यालाही चिकटून बसत नाही. 
  • मुगाच्या डाळीचा हलवा करताना त्यात थोडेसे दूध आणि साय घालावी. हलवा अतिशय रुचकर होतो. 
  • मुगाच्या डाळीचा हलवा करताना दूध, तूप, ओली डाळ परतत असताना चुकून जरी थोडीशी लागली तरी हलव्याचा रंग आणि चव बदलते. म्हणून ते टाळावे. डाळ कच्ची राहिली तर हलव्याला मुगाचा उग्र वास येतो. 
  • डाळ मंद आचेवर खमंग भाजावी. सतत थोडे थोडे तूप घालून ढवळत राहावे. डाळ बुडाला लागून लगेच करपते.

Wednesday 30 May 2018

ओल्या नारळाच्या करंज्या

  • दूध व पाणी समप्रमाणात घेऊन त्यात मैदा भिजवल्यास ओल्या नारळाच्या करंज्या जास्त खुसखुशीत होतात. 
  • सारणात एक चमचा तांदळाची पिठी घालावी. सारणाला पाणी सुटत नाही. 
  • सारणात एक चमचा तूप घालावे. सारणाला चिकटपणा तर येत नाहीच तसेच ते छान मोकळेही होते. 
  • मैदा मंद गॅसवर गरम होईपर्यंत भाजावा. करंज्यांना मोहन कमी लागते.

Monday 14 May 2018

साखरभात


  • तांदूळ जुने व बारीक घ्यावेत, भात मोकळा होतो. नव्या तांदळाचा साखरभात चिकट आणि पांचट होतो. 
  • भात करताना तांदूळ चांगले शिजवून घ्यावेत. कच्चा भात पाकात घातल्याबरोबर आक्रसतो. 
  • तांदूळ तुपात भाजल्याने भात मोकळा व खमंग होतो. 
  • साखरभात करताना नेहमी जेवढे तांदूळ तेवढीच साखर घ्यावी आणि साखरेच्या निम्मे पाणी घालून गोळीबंद पाक करावा. त्या पाकात भात घालावा. 
  • पाक पक्का झाल्याची खात्री करून मगच भात घालावा नाहीतर भात घातल्यावर पटकन आळून न येता पातळच राहतो. 
  • गॅस अगदी मंद ठेवावा. त्यामुळे शिते टणक होत नाहीत. 
  • साखर घालताना सोबत चमचाभर खवा थोडासा भाजून घालावा. साखरभात चविष्ट होतो. 
  • भातावर ब्रेडचा तुकडा ठेवल्यास साखरभात मोकळा होतो. 
  • शिजवताना लिंबाचा रस घालून चांगला हलवावा. साखरभात दिसतो तर छानच शिवाय चवही वेगळीच येते. 
  • भातात रंग घालायचा असेल तर लिंबू पिळू नये. त्यामुळे भात कडवट होण्याची शक्यता असते. 
  • साखरभात चांगला निवल्यावरच वाढावा. आधी करून ठेवलेला, मुरलेला साखरभात चविष्ट लागतो. 

नारळीभात 
  • तांदळाच्या बरोबरीने नारळाचा चव घेतल्यास नारळीभात चवदार होतो. 
  • भात झाला असे वाटले की गॅसवर जाड तवा ठेवावा व त्यावर भाताचे पातेले झाकून ठेवावे. तवा चांगला तापल्यावर गॅस बंद करावा. भात बराच वेळ गरम राहून मोकळा होतो. 
  • लवंगाची फोडणी करण्याऐवजी लवंगाची पूड करून भातात वापरल्यास त्याचा वास सर्व भातास सारखा लागतो. तसेच थोड्या लवंगाही पुरतात. 
  • आदल्या दिवशी करून ठेवून दुसऱ्या दिवशी वाढायचे वेळी कुकरमध्ये गरम करून घेतल्यास भात जास्त स्वादिष्ट लागतो.

Friday 11 May 2018

रसगुल्ले



  • रसगुल्ले बनविण्यासाठी गाईचेच दूध वापरावे. त्यात स्निग्धांश कमी असतात. जास्त स्निग्धांश असलेल्या दुधाचे पनीर कोरडे होते व त्यामुळे रसगुल्ले जाळीदार होतात. 
  • रसगुल्ल्यांसाठी पनीर करताना दुधात लिंबूरसाऐवजी व्हिनिगर घालावे. पनीर जास्त चांगले होते. लिंबामुळे पनीरला पिवळट रंग येतो.
  • रसगुल्ले करताना एक लिटर दुधाच्या पनीरला मैद्याऐवजी एक टी-स्पून दुधाची पावडर वापरावी. रसगुल्ले स्वादिष्ट होतात. 
  • रसगुल्ल्याच्या पनीरमध्ये मैदा, रवा वगैरे काहीही मिसळायची जरुरी नसते. पनीर खूप मळल्याने रसगुल्ले हलके होतात. फुटतही नाहीत. 
  • पनीरचे गोळे करण्यापूर्वी एक चमचा साखर टाकावी. ती पाकात विरघळते आणि रसगुल्ले जाळीदार होतात. रसगुल्ले करताना नेहमी दुधावरची पहिली साय काढून टाकावी. 
  • रसगुल्ले उकळताना साखरेच्या मिश्रणात रिठ्याच्या पाण्याचे चार-पाच थेंब टाकले असता रसगुल्ले चांगले मऊ आणि फुगीर होतात. 
  • रसगुल्ल्यात बेकिंग पावडर टाकावी. रसगुल्ले हलके होतात. 
  • रसगुल्ल्याचे गोळे वळताना त्यात एक खडीसाखरेचा दाणा टाकावा. पाक आत शिरतो. 
  • रसगुल्ला पाकात टाकल्याबरोबर वर तरंगला म्हणजे पनीर चांगले मळले गेले आहे असे समजावे. 
  • तयार झालेला रसगुल्ला पाण्यात टाकून पाहावा. वर तरंगला तर समजावे चांगला झाला. जरासा बुडाल्यासारखा वाटला तर समजावे की बिघडला. मग पुन्हा गार पाण्याचे हबके मारून ते रसगुल्ले दहा-बारा मिनिटे तरी शिजवावे. 
  • पाक उकळत असतानाच त्यात रसगुल्ले सोडावे. उकळीबरोबर ते फुलतातच. 
  • रसगुल्ले पाकात टाकल्याबरोबर फुटत असतील तर पनीर अजून मळावे व फुटलेल्या रसगुल्ल्यावर उकळत असताना चिमूटभर साखर टाकावी. रसगुल्ला पाकात पूर्णपणे विरघळत नाही. 
  • प्रेशर कुकरमध्ये कच्चा पाक करून त्यात रसगुल्ले घालून झाकण लावावे. वर प्रेशर ठेवावे. गॅस बारीक करून दहा मिनिटे गरम करावे. नंतर लगेच प्रेशर कुकर नळाखाली ठेवावा व नंतर गार पाण्यात ठेवावा. रसगुल्ले हलके होऊन दुप्पट मोठे होतात.

रसमलई 
  • डब्यातील रसगुल्ले वापरायचे असल्यास ते गरम पाण्यात थोडावेळ भिजत ठेवावे. रसगुल्ले फुगून आकाराने दुप्पट होतात. नंतर ते रसमलईसाठी वापरावेत. 
  • रसमलईसाठी दूध आटवू नये, नाहीतर खाताना तोंडात साय येते. 

Saturday 21 April 2018

खीर करतांना...


  • तांदळाची खीर साखरेऐवजी पिवळाधमक गूळ वापरून केल्यास जास्त स्वादिष्ट लागते.
  • तांदळाच्या खिरीत गूळ घातल्यास त्यात वेलचीबरोबर थोडे जायफळ व थोडी खसखस पूड करून घालावी. खीर खमंग लागते. 
  • शेवयाची खीर दाट करण्यासाठी तुपात शेवया आणि एक मोठा चमचा बेसन खरपूस भाजून खिरीत घालावे. खीर दाट तर होतेच शिवाय खिरीला रंगही छान येतो अन चवही. 
  • शेवयांची खीर आटवताना मिश्रणात थोडे भिजवलेले जाड पोहे घालावेत. खीर लवकर आटते. 
  • बाजारातील मशीनच्या शेवया लवकर शिजतात व जास्त शिजल्यावर त्याचा गोळा होतो. म्हणून दूध अगोदरच आटवून घ्यावे व शेवया घातल्यानंतर थोडे उकळावे. 
  • पाकिटातील शेवया भाजलेल्या असतात. अशा शेवया तुपावर पुन्हा भाजायची जरुरी नसते. उकळत्या आटीव दुधात तशाच सोडल्या तरी खीर चांगली होते. 
  • शेवया थोड्या तुपावर तांबूस परतून घ्याव्या. त्यात थोडे पाणी घालून एक उकळी आणावी. मग गाळण्यात शेवया घालून पाणी काढून टाकावे. शेवया बऱ्याच दिवसांच्या असल्यास किंवा त्यांना वास येत असल्यास तो निघून जातो, तसेच त्यातील मिठाचा अंश निघून जातो. 
  • खारकेची खीर करताना खारकांचा गर थोड्या पाण्यात शिजवून त्यात साखर घातल्यानंतर शेवटी दूध घातल्यास खीर फुटत नाही. 
  • खसखस एक तास भिजत ठेवून नंतर वाटून खीर केल्यास ती दाट व खमंग होते. 
  • खसखशीच्या खिरीसाठी शिळे दूध वापरू नये. त्यामुळे खीर खराब होण्याची शक्यता असते.

Friday 20 April 2018

खीर


  • खीर करताना कित्येकदा दूध फुटते म्हणून खिरीत दूध घालताना त्याला एक लहान चमचा कॉर्नफ्लोअर लावून मग ते ओतावे. दूध फुटत नाहीच पण खीर चांगली दाट आणि पांढरीशुभ्र दिसते. 
  • दूध फुटेल असे वाटत असेल तरच त्यात चिमूटभर सोडा घालावा. 
  • जेवढी साखर घालावयाची असेल तर तेवढ्या साखरेचा घट्ट पाक करून खिरीत घातल्यास खीर आळत नाही. 
  • घट्ट आणि चविष्ट खीर हवी असेल तर ओले खोबरे किसून तांदळासोबत दुधात टाकावे. एक लिटर दुधासाठी शंभर ग्रॅम किसलेले खोबरे पुरेसे आहे. 
  • खीर करताना ती अगदी पूर्ण शिजल्यानंतरच त्यात हवी तेवढी साखर वा गूळ घालावा. 
  • खीर खमंग व दाट होण्यासाठी थोड्या साजूक तुपावर तीन-चार लवंगा व थोडे बेसन मंद आचेवर खरपूस भाजावे. खिरीचे दूध हळूहळू त्यात ओतावे. चांगले ढवळून एक उकळी आणावी, नंतर ते दूध खिरीसाठी वापरावे. 
  • दूध कमी पडले तर गार दुधात कस्टर्ड पावडर किंवा गरम पाण्यात खवा मिसळून खिरीत घालावा. 
  • खीर तयार झाल्यावर तिच्यावर साय चढतेच. म्हणून त्यावर थोडीशी साखर टाकावी, साय येत नाही. 
  • वाढताना खीर फार दाट झाली आहे असे वाटल्यास साधे दूध घालून सारखी करून वाढावी. 
  • खिरीत दोन पेढे कुस्करून घालावे, खीर दाट होतेच शिवाय चवही वेगळीच लागते. 
  • दुधाचा केशरी मसाला असल्यास खिरीत एक-दोन चमचे घालावा. म्हणजे काजू, केशर, वेलची इ. वेगळे घालण्याची गरज नाही. 
  • दूध आटतेवेळी जायफळ घालू नये, दूध फाटते. खीर बिघडते. 
  • खिरीत सुकामेवा आधीच घातल्यास तो तळाला बसतो म्हणून खीर करून झाल्यावर हलक्या हाताने सुक्यामेव्याचे तुकडे करून टाकावे. आणि वाढताना ढवळून वाढावे. 
  • बटाटा किसण्याच्या किसणीवर बदाम उभा धरून किसावा. भरपूर व पातळ काप मिळतात. ते खिरीत घातल्यास तळाला न जात वर तरंगतात. बदामही कमी लागतात. 

Saturday 7 April 2018

खोबऱ्याच्या वड्या

  • फ्राय-पॅन किंवा कढईत साखर घालून, थोडेसे पाणी घालून त्याचा पक्का पाक करावा आणि मग खोबरे टाकून परतावे. खोबऱ्याच्या वड्या लवकर तयार होतातच पण खुसखुशीतही होतात. 
  • खवलेले खोबरे, दूध, साखर सारख्या प्रमाणात एकत्र करून मिक्सरमधून काढून जाड बुडाच्या कढईत शिजत ठेवावे. त्यामुळे खोबरे अगदी बारीक होऊन दूध-साखरेत एकजीव होते. इतकेच नाही तर वड्या पडताना चुराही कमी पडतो. 
  • खोबरे दुधातच शिजवल्याने दुधाचा नैसर्गिकरित्या खवा तयार होऊन अगदी ताज्या खव्याची चवही वड्यांना येते.
  • वड्यांच्या मिश्रणात थोडे दूध व साय घातल्यास खोबऱ्याच्या वड्या मऊसूत होतात. 
  • ओल्या खोबऱ्याच्या वड्या करताना त्यात थोडेसे बीट किसून घालावे, वड्यांना छान गुलाबी रंग येतो. 
  • एका नारळात दोन टेबलस्पून बूस्ट किंवा बोर्नव्हिटा घालावे. वड्या अगदी चॉकलेटसारख्या लागतात. 
  • खोबरे आणि दुधाच्या मिश्रणात एक मध्यम बटाटा उकडून कुस्करून अगदी मऊ करून घालावा. वड्या खोबरे आणि दुधाच्या मिश्रणापेक्षा लवकर तयार होतात. 
  • दुधाऐवजी मिल्क पावडर वापरावी. वड्या पटकन तर होतातच पण त्यांचा स्वादही वेगळाच लागतो. 
  • थोडासा गुलकंद टाकावा. खोबऱ्याच्या वडीला वेगळीच चव येते. 
  • वड्या करताना त्यात थोडा खायचा केशरी रंग घालावा, खोबऱ्याच्या वड्यांना छान रंग येतो. 
करून पहा !
  • ओल्या खोबऱ्याच्या वड्या करताना, नारळ फोडून खोबऱ्याच्या पाठीचा भाग सोलून त्याच्या भाजीसारख्या फोडी कराव्यात. नंतर त्यात थोडेसे दूध घालून मिक्सरमधून काढून त्याच्या वड्या कराव्या. वेळही वाचतो आणि अगदी पांढऱ्याशुभ्र होतात. 
  • नारळ खवण्याचे श्रम वाचवायचे असतील तर नारळ फोडून त्याच्या वाट्या प्लॅस्टिकच्या पिशवीत घालून फ्रीजमध्ये ठेवाव्यात. दुसऱ्या दिवशी वाट्या जमिनीवर आपटल्याबरोबर खोबऱ्याचा पांढरा भाग सुटून येतो. साल सोलून काढल्यावर खोबऱ्याचे बारीक तुकडे करून मिक्सरमधून काढावे. खवण्याचे श्रम वाचतात.

Wednesday 4 April 2018

वड्या करताना...

  • वड्या करण्यासाठी जाड बुडाचे पितळी पातेले प्रेशर पॅन घ्यावे. स्टीलच्या किंवा ऍल्युमिनियमच्या पातेल्यात मिश्रण लगेच करपते. 
  • वड्या करण्यासाठी मिश्रणाच्या मानाने पातेले बरेच मोठे घ्यावे. मिश्रण चांगले घोटता येते. 
  • मिश्रण तयार झाले की नाही हे पाहण्यासाठी शिजणाऱ्या मिश्रणाचे पातेले खाली उतरवून ठेवावे. बशीत थंड पाणी घ्यावे. छोट्या गोळीएवढे मिश्रण पाण्यात टाकावे. बशीत गोळी बुडेल इतपत पाणी असावे. नंतर ते ओतून द्यावे व मिश्रणाची गोळी वळते का ते पहावे. गोळी नरम वळली परंतु बोटांना चिकटली नाही म्हणजे मिश्रण तयार झाले असे समजावे. गोळी वळल्यावर बोटांना चिकटली तर मिश्रण पुन्हा शिजवावे. 
  • कोणत्याही प्रकारच्या वडीत खवा घातल्यास मिश्रण लवकर घट्ट होते व चवीला अधिक चांगल्या लागतात. 
  • मिश्रण शिजल्यावर गॅस बंद केल्यानंतर थोडी पिठीसाखर मिश्रणात घालून घोटून घ्यावी व मग वड्या थापाव्यात. वड्या खुटखुटीत होतात. 
  • वड्या करताना थापण्यापूर्वी थाळीला तूप लावावे. वड्या थाळीला चिकटत नाहीत. 
  • वड्या थापण्यासाठी शक्यतो चौकोनी ट्रे घ्यावा. यामुळे वड्या एकसारख्या कापल्या जातात. कडेचा एकही तुकडा वाया जात नाही. 
  • वाटीला तूप लावून वड्या थापल्या असता वड्या वरून गुळगुळीत होतात. 
  • वड्या थापताना मिश्रणावर प्लॅस्टिकचा कागद ठेवून थापल्यास गरम मिश्रण हाताला न चिकटता सारखे थापले जाते. शिवाय बोटांचे ठसे वड्यांवर न उमटता त्या गुळगुळीत व चकचकीत दिसतात. 
  • वड्यांचे मिश्रण ताटात पसरविल्याबरोबर लगेच वड्या कापाव्या. मिश्रण थंड झाल्यावर वड्या काढाव्यात. यामुळे कापलेल्या आकारातच वड्या पडतात. 
  • वड्या कापताना सुरीला तूप लावून त्याने कापाव्यात, म्हणजे वड्या सुरीला चिकटत नाहीत. 
  • वड्या काढताना सैलसर झाल्या आहेत असे वाटले तर त्याच जागी त्या उलटून ठेवाव्या. 
  • वड्या पूर्ण सुकण्यापूर्वीच अलगद काढाव्यात. फार कोरड्या झाल्यावर काढताना त्या मोडतात.
  • वड्या तळाला चिकटून सुरीने सुटत नसतील तर थाळी मंद विस्तवावर मिनिटभर ठेवावी. वड्या सुटतात. 
  • उकळत्या पाण्याच्या पातेल्यावर थाळी ठेवल्यानेही वड्या सुटतात. 

सांजाच्या पोळ्या

कणीक चांगली तिंबून घ्यावी, नाहीतर पोळ्या चिवट होतात.  रवा कमी तेलावर भाजावा, नाहीतर सांजा चिकट होऊन पोळीत नीट भरता येत नाही.  रव...

... तर काय कराल ?