- डाळ फार वेळा चोळून चोळून धुवू नये, डाळीचे सत्व निघून जाते.
- डाळ शिजवण्यापूर्वी दोन तास तरी भिजत ठेवावी. लवकर शिजते.
- डाळ कुकरमधून घालून शिजवताना स्टीलच्या भांड्याचा वापर करावा. कुकरमध्ये स्टीलचे भांडे न ठेवता पुरण शिजवले तर हमखास काळपट होते.
- डाळ शिजवताना गरम पाण्यात चमचाभर तेल घालावे. पुरण लवकर शिजते. किंचित खायचा सोडा घातल्यानेही डाळ लवकर शिजते.
- डाळीला थोडीशी कड आली की त्यात जराशी हळद आणि तेल घालावे, डाळ लवकर शिजते. हळदीमुळे पुरणाला रंगही छान येतो.
- डाळ आणि पीठ या दोन्ही गोष्टी सारख्याच प्रमाणात घ्याव्यात पीठ उरत नाही.
- गुळाबरोबर थोडीशी साखर घातली तर पुरण लवकर शिजतेच पण गोडीही चांगली येते व पोळी लाटायलाही सोपी जाते.
- डाळ शिजताना त्यात दोन-तीन चमचे तांदूळ धुवून घालावेत. डाळीचा चिकटपणा वाढतो.
- डाळीचा कट जास्त पाणी घालून कधीही काढू नये, त्यामुळे पुरणाचा स्वाद कमी होतो.
- पुरण शिजवताना त्यात उलथने उभे राहिले की पुरण तयार झाले असे समजावे.
- पुरण चांगले शिजल्याची आणखी एक खूण म्हणजे पुरणाचा खमंग वास येतो आणि पातेल्यात कड वाळलेली दिसते.
- पुरण शिजवताना त्यात कधीही वेलदोडा किंवा जायफळपूड वगैरे मिसळू नये. त्यांचा स्वाद हमखास उडून जातो. पुरण चांगले वाटून झाल्यावरच जायफळ किंवा वेलदोड्याची पूड मिसळावी. स्वाद वाढतो.
- पुरणात किंचित मिरे वाटून घातल्यास पोळ्या बाधत नाहीत.
- पुरण सैल झाले तर पोळी पोळपाटाला चिकटते. अशा वेळी पुरण थोडे गरम करून घट्ट करावे. पोळी छान होते.
- सैल पुरण नॉनस्टीक कढईत घालून मंद गॅसवर परतल्यावरही घट्ट होते.
- चिमूटभर सोडा घातल्यानेही सैल पुरण घट्ट होते.
- पुरण सैल वाटले तर मलमलच्या कपड्यावर पसरावे. कापड पाणी शोषून घेतो आणि पुरण खुटखुटीत होते.
No comments:
Post a Comment