Pages

Saturday 3 February 2018

श्रीखंड : चक्का घोटताना...

  • चक्क्यात साखर मिसळताना थोडेसे फेटलेले क्रीमही मिसळावे, श्रीखंडाला छान चव येते. (एक किलो चक्क्यात २०० ग्रॅम क्रीम मिसळावे.)
  • चक्का घोटताना त्यात किंचित मीठ घालावे, चव वाढते. 
  • चक्क्यात पिठीसाखरेचाच वापर करावा. ती लवकर तर विरघळते आणि श्रीखंड पातळ होत नाही. 
  • साखर घालताना नेहमी आधी चक्क्याची चव घ्यावी व मग साखरेचे प्रमाण ठरवावे. 
  • साखर एकाचवेळी भरपूर घालावी. कमी साखर घातली तर श्रीखंड लवकर फसफसते. त्याला जाळी पडते. नंतर त्यात कितीही साखर मिसळली तरी चांगले लागत नाही. 
  • सायीमध्ये थोडीशी पिठीसाखर मिसळून एकजीव करून ती साय चक्क्यात मिसळावी. श्रीखंडाला वेगळीच चव येते. 
  • श्रीखंडात घालायचे केशर किंचित कोमट दुधात मिसळून ठेवावे व मग ते चक्क्यात घालावे. चांगले पसरते. 
  • श्रीखंड करायच्या दोन दिवस आधीच एका छोट्या भांड्यात एक-दीड कप दूध घ्यावे. त्या दुधात केशर किंचित खलून, वेलदोड्याची पूड घालून फ्रीजमध्ये ठेवावे, श्रीखंड गाळताना हे दूध त्यात थोडे थोडे घालत राहावे, अगदी कमी केशर, वेलची वापरून श्रीखंडाला भरपूर स्वाद आणता येतो. 
  • चक्का घोटतानाच त्यात वेलची, जायफळ, रंग घातल्यास रंग सारखा लागतो. वेलची-जायफळाचा वासही चांगला लागतो. 
  • श्रीखंड खूप घट्ट झाल्यास त्यात थोडेसे दूध घालावे. चमच्याला चिकटून बसत नाही. आंबतही नाही. 
  • श्रीखंड आंबट झाले तर त्यात थोडा खायचा सोडा दुधात विरघळून घालावा. आंबटपणा लगेचच निघून जातो. 
  • उन्हळ्यात श्रीखंडात साखर कमी घातल्यास श्रीखंड फसफसते. 
  • श्रीखंड फसफसू नये म्हणून चक्का फेसावा व साखरेत, साखर भिजेल एवढेच दूध घालून साखर अर्धवट विरघळली की फेसलेला चक्का घालावा आणि कालवावे.
  • श्रीखंड फसफसू नये म्हणून त्यात थोडे दूध घालावे व गॅसवर ठेऊन एक चटका द्यावा.  
  • फ्रीज नसेल तर उरलेल्या श्रीखंडात थोडी साखर घालून गार पाण्यात पातेले ठेवावे. श्रीखंड फसफसत नाही.  
  • साखर चांगली मिसळून घोटलेले श्रीखंड फ्रीजबाहेरही एक दिवस चांगले राहू शकते. 
  • श्रीखंड उरले तर त्यावर थोडी पिठीसाखर भुरभुरावी. आंबटपणा येत नाही. 
  • उरलेले श्रीखंड प्लॅस्टिकच्या छोट्या डब्यात अथवा बटरपेपरमध्ये गुंडाळून फ्रिजरमध्ये ठेवल्यास महिनाभर टिकते. 

-----------------------------

No comments:

Post a Comment

सांजाच्या पोळ्या

कणीक चांगली तिंबून घ्यावी, नाहीतर पोळ्या चिवट होतात.  रवा कमी तेलावर भाजावा, नाहीतर सांजा चिकट होऊन पोळीत नीट भरता येत नाही.  रव...

... तर काय कराल ?