- वड्या करण्यासाठी जाड बुडाचे पितळी पातेले प्रेशर पॅन घ्यावे. स्टीलच्या किंवा ऍल्युमिनियमच्या पातेल्यात मिश्रण लगेच करपते.
- वड्या करण्यासाठी मिश्रणाच्या मानाने पातेले बरेच मोठे घ्यावे. मिश्रण चांगले घोटता येते.
- मिश्रण तयार झाले की नाही हे पाहण्यासाठी शिजणाऱ्या मिश्रणाचे पातेले खाली उतरवून ठेवावे. बशीत थंड पाणी घ्यावे. छोट्या गोळीएवढे मिश्रण पाण्यात टाकावे. बशीत गोळी बुडेल इतपत पाणी असावे. नंतर ते ओतून द्यावे व मिश्रणाची गोळी वळते का ते पहावे. गोळी नरम वळली परंतु बोटांना चिकटली नाही म्हणजे मिश्रण तयार झाले असे समजावे. गोळी वळल्यावर बोटांना चिकटली तर मिश्रण पुन्हा शिजवावे.
- कोणत्याही प्रकारच्या वडीत खवा घातल्यास मिश्रण लवकर घट्ट होते व चवीला अधिक चांगल्या लागतात.
- मिश्रण शिजल्यावर गॅस बंद केल्यानंतर थोडी पिठीसाखर मिश्रणात घालून घोटून घ्यावी व मग वड्या थापाव्यात. वड्या खुटखुटीत होतात.
- वड्या करताना थापण्यापूर्वी थाळीला तूप लावावे. वड्या थाळीला चिकटत नाहीत.
- वड्या थापण्यासाठी शक्यतो चौकोनी ट्रे घ्यावा. यामुळे वड्या एकसारख्या कापल्या जातात. कडेचा एकही तुकडा वाया जात नाही.
- वाटीला तूप लावून वड्या थापल्या असता वड्या वरून गुळगुळीत होतात.
- वड्या थापताना मिश्रणावर प्लॅस्टिकचा कागद ठेवून थापल्यास गरम मिश्रण हाताला न चिकटता सारखे थापले जाते. शिवाय बोटांचे ठसे वड्यांवर न उमटता त्या गुळगुळीत व चकचकीत दिसतात.
- वड्यांचे मिश्रण ताटात पसरविल्याबरोबर लगेच वड्या कापाव्या. मिश्रण थंड झाल्यावर वड्या काढाव्यात. यामुळे कापलेल्या आकारातच वड्या पडतात.
- वड्या कापताना सुरीला तूप लावून त्याने कापाव्यात, म्हणजे वड्या सुरीला चिकटत नाहीत.
- वड्या काढताना सैलसर झाल्या आहेत असे वाटले तर त्याच जागी त्या उलटून ठेवाव्या.
- वड्या पूर्ण सुकण्यापूर्वीच अलगद काढाव्यात. फार कोरड्या झाल्यावर काढताना त्या मोडतात.
- वड्या तळाला चिकटून सुरीने सुटत नसतील तर थाळी मंद विस्तवावर मिनिटभर ठेवावी. वड्या सुटतात.
- उकळत्या पाण्याच्या पातेल्यावर थाळी ठेवल्यानेही वड्या सुटतात.

No comments:
Post a Comment