- लाटताना पोळपाटाखाली स्वच्छ मोठा कागद पसरावा. सांडलेली पिठी फुकट जात नाही, पुन्हा वापरता येते.
- वर्तमानपत्राच्या कागदावर पुरणपोळ्या लाटण्याची अनेकांना सवय असते. ती योग्य नव्हे. वर्तमानपत्राची शाई पोळ्यांना हमखास लागते. म्हणून पोळ्या लाटताना पांढरा स्वच्छ कागदच वापरावा.
- पोळपाटाला पांढरा स्वच्छ मलमलचा कपडा अगदी ताठ बांधून पोळी लाटावी, लाटणे तर सोपे जातेच शिवाय पोळी पोळपाटाला चिकटत नाही.
- पोळपाटावर ब्राऊन पेपर पसरून त्यावर पोळी लाटावी, चिकटत तर नाहीच पण तांदळाची पिठीही कमी लावावी लागते.
- लाटताना नेहमी कमी पिठाची वाटी तयार करून त्यात किमान अडीच पट तरी पुरण घालून उंडा तयार करावा व नंतर पोळी लाटावी. भरपूर पुरण घातलेल्या पुरणपोळ्याच नेहमी स्वादिष्ट लागतात.
- उंड्यात पुरण जास्त झाले तर लाटताना ते पोळीतून बाहेर येते आणि कमी झाले तर पोळीच्या कडेपर्यंत ते जात नाही आणि पोळी साध्या पोळीसारखी लागते.
- लाटताना नेहमी सुवासिक तांदळाची अगदी बारीक दळलेली पिठी वापरावी. ती न मिळाल्यास मैदा वापरावा. पोळ्या लाटणे सोपे जाते.
- पोळीवर पिठी राहू नये म्हणून मऊ रुमाल अलगद पोळीवर फिरवावा, रुमालाला पिठी चिकटते. तो रुमाल नंतर स्वच्छ कागदावर किंवा ताटात झटकावा. ती पिठी पुन्हा वापरता येते.
- लाटताना नेहमी मध्यभागाकडून बाहेरच्या बाजूला लाटावे, त्यामुळे पुरण अगदी काठापर्यंत जाते.
- लाटताना पोळी उलटून लाटावी म्हणजे पुरण आतल्या आत सर्व बाजूने चांगले पसरते.
- पोळी लाटताना फक्त दोनदाच उलटावी. जास्त वेळा उलटल्याने चिवट तर होतेच पण भाजताना डागाळली जाते.
- पुरण जास्त घट्ट झाले तर कोरडे होते व पोळी झाल्यावर पुरण बाहेर येते. अशा वेळी दूध किंवा कटाच्या पाण्याच्या हाताने सारखे मळून घ्यावे.
- पुरण भरलेला गोळा तेलात बुडवून बटर पेपरवर लाटावा, पोळी अगदी कागदासारखी पातळ लाटता येते.
- पोळ्या खूप दिवस टिकवायचा असतील तर थोड्याशा तुपावर वाटलेले पुरण परतून घ्यावे, पोळ्या बऱ्याच टिकतात.
No comments:
Post a Comment