- तव्याला बाहेरून ओली माती लावावी, पुरणपोळ्या छान भाजल्या जातात.
- पोळ्या भाजताना दोन वेळाच तव्यावरून उलटसुलट परताव्या. सतत परतू नये.
- नेहमी सपाट तवाच वापरावा. त्यामुळे पोळी सरळ झाकणावर ओढून घेऊन परत तव्यावर उलटीकडून टाकता येते.
- सपाट तवा नसल्यास धिरड्यांचा तवा पालथा करून वापरावा.
- पुरणपोळी नेहमी मंदाग्नीवर भाजावी. भाजण्याआधी तव्याला किंचितसा तेलाचा हात लावावा. पोळी न चिकटता चांगली भाजली जाते.
- भाजताना वरून-खालून चमचाभर तूप सोडून भाजावी, रंगही छान येतो अन खमंग तर जास्तच होते.
- पोळी तव्यावर असतानाच चमचाभर तूप सोडून त्यावर दळलेली साखर पसरावी व मग पोळी काढावी. पोळी अतिशय खमंग लागते.
- तव्यावरून काढल्यावर दुसरी पोळी घालण्यापूर्वी तवा मऊ कपड्याने पुसून घ्यावा. लाटताना लागलेले पीठ तव्यावर करपून दुसऱ्या पोळीला चिकटत नाही.
- पोळी तव्यावर हळू उलटावी. मोडू देऊ नये. पुरण बाहेर आले तर तव्याला चिकटून तवा खराब होतो, तवा तसाच वापरला तर सर्वच पोळ्या फुटतात म्हणून तवा खराब झाल्यास परत घासून, पुसून स्वच्छ करून घ्यावा.
- तव्यावरून काढल्यावर पोळ्या नेहमी पांढऱ्या स्वच्छ मोठ्या आकाराच्या कागदावर पसरून ठेवाव्या.
- पोळीच्या आकाराचे कागद आधीच कापून घ्यावेत. तव्यावरून काढताना पोळी या कागदावर काढावी आणि थंड झाली की कागदासकट उचलून डब्यात ठेवावी. त्यामुळे पोळी अखंड तर राहतेच पण दुसऱ्या दिवशीही चवीला शिळी लागत नाही.

No comments:
Post a Comment