- सारण मऊ होण्यासाठी गूळ कुकरच्या डब्यात घालून झाकण ठेवून भाताबरोबर शिजवून घ्यावा. थंड झाल्यावर वापरावा. मळताना हातास तेल लावावे म्हणजे चिकटत नाही.
- गुळाला किंचित खारट चव येत असेल तर गूळपोळी हमखास फसते. तीन वाट्या गुळात एक वाटी साखर मिसळली तर गुळपोळी छान होते.
- सारणात दोन चमचे तेल घालून मळल्यास सारण बाहेर येत नाही.
- सारण करताना त्यात बेसन भाजून घालावे. खसखस, वेलची इ. घातल्यावर गुळात किंचितसा (हरभऱ्याच्या डाळीएवढा) खायचा चुना घालावा आणि गूळ तेलाच्या हाताने मळावा. पोळी फुटत नाही आणि गूळही पोळीभर पसरतो.
- सारण पोळीभर पसरावे यासाठी सारणात जास्त पिकलेल्या केळ्याचा एक इंचाचा तुकडा घालावा आणि चांगला मळून घ्यावा. सारण पोळीभार छान पसरते.
- सारणात खसखस किंवा तीळ घालायचे असल्यास ते अख्खे न घालता भाजून पूड करून घालावे. पोळी खमंग लागते.
- पोळी करताना तिच्या कडा आधी कातणीने गूळ बाहेर येणार नाही अशा रीतीने कापून मग पोळी भाजावी.
- सारणाचे पातेले गरम पाण्यात ठेवावे म्हणजे गूळ शेवटची पोळी लाटेपर्यंत नरम राहतो.
- पोळीचे सारण त्याची गोळी वळेल इतकेच सैल असावे.
- सारण व कणीक दोन्ही सारख्याच प्रमाणात सैल असतील तर सारण पोळीच्या कडेपर्यंत पोहोचते.
- कणकेत कडकडीत तेलाचे मोहन घालून जरा वाफ गेल्यावर ती घट्ट मळावी. यामुळे गूळपोळी मऊ पडत नाही.
- मध्यम आचेवर गूळपोळी खमंग भाजावी. नाहीतर गार झाल्यावर पोळी मऊ पडते.
- पोळ्या अतिशय हलक्या हाताने लाटाव्यात आणि सपाट तव्यावरच भाजाव्यात.
- तवा आणि उलथने ओल्या कपड्याने पुसून घेऊन नंतर दुसऱ्या पोळीसाठी वापरावे.
- पोळ्या करताना व डब्यात भरताना एकापुढे एक उभ्या ठेवाव्यात. एकावर एक रचू नयेत, मऊ पडतात.

No comments:
Post a Comment